
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील खासगी बिल्डरांकडून म्हाडाला मिळालेल्या म्हणजेच 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरांना अर्जदारांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. 565 घरांसाठी आतापर्यंत तब्बल 1,15,293 अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हणजेच एका घरासाठी 200 हून अधिक अर्जदारांमध्ये चुरस असणार आहे. ङ्खाणे, डोंबिवली, टिटवाळा, कल्याण आणि नवी मुंबई अशा विविध लोकेशनवर ही घरे असून 9 लाख 55 हजारांपासून 33 लाख 55 हजारांपर्यंत या घरांच्या किमती आहेत.
कोकण मंडळाच्या 5,285 घरांमध्ये 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण 565 घरे, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3002 घरे, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेली 1677 घरे तसेच 50 टक्के योजनेअंतर्गत 41 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 5,285 घरांसाठी आतापर्यंत दीड लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. खासकरून अर्जदारांचा कल 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत असलेल्या घरांकडे दिसतोय.
नवी मुंबईतील घरांना पसंती
यंदा नवी मुंबईतील घरांचा लॉटरीत समावेश करण्यात आल्यामुळे अर्जदारांची संख्या वाढल्याची चर्चा आहे. दिघा येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी अवघ्या 18 लाख 59 हजार रुपयांमध्ये घर असून येथे 112 घरे विक्रीसाठी आहेत. याशिवाय नेरूळ, सानपाडा, घणसोली अशा नवी मुंबईतील प्राईम लोकेशनवर घरे उपलब्ध आहेत.