कोकणचे वैभव असलेल्या कातळशिल्पाचे संवर्धन होणार, देवाचे गोठणेतील रावणाला राज्य संरक्षित दर्जा मिळणार

देवाचे गोठणे रावणाचा माळ येथील प्रागौतिहासिककालीन कातळशिल्प हे संरक्षित स्मारक म्हणून उदयाला येण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत त्यासाठी हरकती वा सूचना मागवल्या आहेत.

महाराष्ट्रातील प्राचीन स्मारके व पुराण वास्तू शास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम 1960 अन्वये अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हे कातळशिल्प राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. देवाचे गोठणे येथे मुकुंद वासुदेव आपटे व गोविंद शंकर आपटे यांच्या जमीन मिळकतीत हे प्रागौतिहासिककालीन कातळशिल्प आढळून आले. या कातळशिल्पामध्ये एक मनुष्यकृती दर्शवण्यात आली आहे.

काय आहे कातळशिल्प
देवाचे गोठणे हे रत्नागिरी जिह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे, जेथे कातळशिल्पे आहेत. या कातळशिल्पांमध्ये आदिमानवाने विविध आकार कोरलेले आहेत आणि ती सुमारे 45 हजार वर्षांपूर्वीची असावीत असा अंदाज आहे.