
ऑगस्टमध्ये पावसाने मुंबईला झोडपून काढलं होतं. आता मुंबईला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने
मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला असून जोरदार पाऊस, वीजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तवली आहे.
इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. मुंबईसाठी बुधवार ते शुक्रवारदरम्यान यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड जिल्हा मात्र बुधवार ते शुक्रवार या कालावधीत ऑरेंज अलर्टखाली राहणार आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबईत अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. हवामान खात्याच्या माहितीनुसार रविवारी ते सोमवारी सकाळपर्यंत सांताक्रूझ केंद्रात 7.4 मिमी पावसाची नोंद झाली, तर कुलाबा वेधशाळेने 3.4 मिमी पावसाची नोंद झाला होता. रविवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी सकाळी ढगाळ हवामान होते आणि दिवसभरात हलक्या सरी कोसळल्या.
हवामान तज्ज्ञांनी पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता आणखी वाढेल अशी शक्यता वर्तवली आहे. मंगळवारी मुंबई आणि शेजारील जिल्ह्यांसाठी कोणताही इशारा जारी केलेला नसला तरी बुधवारीपासून यलो अलर्ट लागू होणार आहे.
स्वतंत्र हवामान निरीक्षक आथ्रेया शेट्टी यांनी सांगितले की बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात ओडिशा किनाऱ्याजवळ नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. पुढील 24 तासांत हे क्षेत्र वायव्य दिशेकडे सरकणार असून त्यामुळे पावसाची तीव्रता वाढेल, असे शेट्टी यांनी सांगितले.
तसेच आठवड्याच्या उत्तरार्धात पाऊस आणखी तीव्र होणार आहे. शुक्रवारी हे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश पर्यंत पोहोचेल.
मुंबईत जूनपासून आतापर्यंत 2,501 मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. यापैकी फक्त ऑगस्ट महिन्यातच 1,484 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, संपूर्ण मुंबईत जूनपासून आतापर्यंत 1,662 मिमी पाऊस झाला आहे.