
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर पाच दिवसांनी आमरण उपोषण मागे घेतलं. आज सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आले होते. या शिष्टमंडळाने जरांगे यांनी केलेल्या हैदराबाद गॅझेटची मागणी सरकारने मान्य केली असल्याचं सांगितलं. मराठा उपसमितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचे जाहीर केले. याचा जीआरही उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांना दिला. जो जरांगे पाटलांनी स्वीकारला आणि आपलं उपोषण मागे घेतलं.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताच आंदोलकांकडून जल्लोष करण्यात आला. तर जरांगे यांना अश्रु अनावर झाल्याचे यावेळी पाहायला मिळालं. जरांगे यांनी मराठा बांधवांना गावाकडे जाताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मी आता रुग्णालयात जाणार आहे, असंही त्यांना सांगितलं.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी सरकारकडे मराठा आरक्षणासंदर्भात आठ मागण्या केल्या होत्या, ज्यातील सहा मागण्या पूर्ण झाल्या आहेत, असं वृत्त ‘साम टीव्ही’ने दिलं आहे.