
मुंबईसह जगभरात उद्या दहा दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहे. मुंबईतील चौपाट्यांवर बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक घराबाहेर पडतील. अशावेळी मुंबईतील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबईत तब्बल 21 हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. यंदा मुंबई पोलिसांतर्फे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुव्यवस्था राखण्यासाठी AI चा वापर करण्यात येणार आहे. सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी आणि सह पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी पत्रकार परिषद घेत गणपती विसर्जनाबाबत माहिती दिली.
गणपती विसर्जनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले की, यंदा मुंबईत साडे सहा हजार सार्वजनिक गणपती व दीड लाख घरगुती गणपतीचं विसर्जन होणार आहे. मुंबई पोलिसांनी विसर्जनाची सर्व व्यवस्था चोख ठेवली आहे. मुंबईत 65 ठिकाणी नैसर्गिक व 205 ठिकाणी कृत्रिम विसर्जनाची सोय आहे. त्याठिकाणांवर 10 सह पोलीस आयुक्त, 40 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 3000 पोलीस निरिक्षक, 15 हजार कॉन्स्टेबल, राज्य राखील पोलीस दलाच्या 14 तुकड्या, चार शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तीन दंगल नियंत्रण पथकाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईत विसर्जनाच्या ठिकाणी दहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोन कॅमेरे सुरक्षेवर लक्ष ठेवणार आहेत. तसेच बंदोबस्ताकरिता मुंबई पोलीस पहिल्यांदाच AI चा वापर करणार आहेत. तसेच विसर्जन कालावधीत परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यावर बंदी राहणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.