अतिक्रिकेटचा ताण गोल्फ खेळून दूर करा! युवराजचा अभिषेक आणि शुभमनला सल्ला

मी जी चूक केली ती चूक अभिषेक आणि शुभमन यांनी करू नये. अतिक्रिकेटमुळे येणारा ताण कमी करण्यासाठी मी त्या दोघांसह अन्य क्रिकेटपटूंना गोल्फ खेळण्याचा सल्ला देतो. गोल्फ खेळल्याने विचारांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते तसेच क्रिकेट सामन्यांमध्ये लक्ष पेंद्रित करण्यासाठी त्याचा फायदा होतो, अशा शब्दांत हिंदुस्थानचा माजी स्पह्टक फलंदाज युवराज सिंग याने आपले शिष्य असलेल्या शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांना सल्ला दिला आहे. जर क्रिकेट कारकीर्दीमध्ये मी जर गोल्फ खेळलो असतो तर 3 हजारपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या असत्या, असे तो म्हणाला.

येत्या मंगळवारपासून (दि. 9) आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होत असून, हिंदुस्थानच्या संघात युवराजच्या दोन्ही शिष्यांची निवड करण्यात आली आहे. युवराज वेळोवेळी या दोघांना सल्ले देत असतो. तसेच अनेक वेळा त्यांची खरडपट्टीदेखील काढतो. आगामी आशिया चषक स्पर्धेमध्ये शुभमन गिल हा प्रदींर्घ कालावधीनंतर टी-20 संघात पुनरागमन करत असल्याने युवराजने शुभमनसह अभिषेकला विशेष सल्ला दिला आहे.

एका कार्यक्रमात युवराज म्हणाला, अभिषेक आणि शुभमन यांनी व्यस्त टाईमटेबलमधून गोल्फसाठी थोडा वेळ काढला पाहिजे. वेळ काढणं कठीण असलं तरी सामन्यांमध्ये अधिक धावा करण्यासाठी गोल्फ खेळण्यास प्राधान्य दिलं पाहिजे. भविष्यात खेळ आणखी सुधारणं हे त्यांच्या हातात असून, गोल्फ त्यांना त्यासाठी मदत करेल. मी सर्व खेळाडूंना गोल्फ खेळण्यासाठी प्रोत्साहित करतो. तणाव दूर करण्यासाठी, विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोल्फ हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंडमधील गोल्फची संस्कृती पाहिली तर बहुतेक सर्वोत्तम क्रिकेटपटू खूप लहानपणापासूनच गोल्फ खेळले आहेत.

हिंदुस्थानची मोहीम 10 सप्टेंबरपासून

9 सप्टेंबरपासून आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होत असून, हिंदुस्थानचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएईबरोबर होणार आहे, तर 14 सप्टेंबर रोजी हिंदुस्थानचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना खेळवला जाऊ नये, असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, या आतंकवादी हल्ल्यानंतर दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ प्रथमच आमने-सामने येणार असल्याने अवघ्या जगाचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे.