
जागतिक टेनिसची अव्वल मानांकित आणि बेलारूसची टेनिसपटू अरिना सबालेंकाने अखेर आपल्या अपराजित जिद्दीचा ठसा उमटवत सलग दुसऱ्यांदा अमेरिकन ओपन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावण्याची किमया साधली. गेल्या दोन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धांमध्ये अमेरिकन खेळाडूकडून अंतिम फेरीत हार पत्करावी लागली होती. मात्र यावेळी अमेरिकन प्रतिस्पर्धी अमांडा अनिसिमोवाला 6-3, 7-6 (3) अशा सरळ सेटमध्ये पराभूत करून सबालेंकाने आपल्या जखमांवर विजयाचे ग्रॅण्डस्लॅम मलम चोळले.
निर्णायक क्षणी ओव्हरहेड स्मॅश नेटमध्ये अडकल्याने एक क्षण सबालेंकाच्या मनात शंका डोकावली. तरीही सबालेंकाने श्वास रोखत मनोधैर्य टिकवले आणि विजयाचे शिखर गाठलेच. सामना संपल्यानंतर कोर्टवर रॅकेट खाली टाकत तिने हसत आनंद व्यक्त केला.
11 वर्षांनंतर अभूतपूर्व यश
सबालेंका गेल्या 11 वर्षांत अमेरिकन ओपनचे विजेतेपद राखणारी पहिली महिला ठरली आहे. याआधी 2012 ते 2014 या काळात दिग्गज सेरेना विल्यम्सने हे अनोखे यश मिळवले होते.
अनिसिमोवाकडून सबालेंकाचे कौतुक
सलग दुसऱ्या ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत पराभव पत्करणाऱ्या 24 वर्षीय अनिसिमोवाने खेळानंतर सबालेंकाचे काwतुक करताना म्हटले, ‘ती खूप मेहनत करते आणि म्हणूनच आज ती या स्थानावर पोहोचलीय. मलादेखील संधी मिळाली, पण मी तिला यशाची मिठी मारू शकले नाही.’
सबालेंकाचा विजय मंत्र
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मॅडिसन कीजकडून आणि फ्रेंच ओपनमध्ये कोको गॉफकडून झालेल्या पराभवाची खंत सबालेंकाला होती. पण यावेळी ती अधिक ठाम होती. सबालेंका म्हणाली, ‘ऑस्ट्रेलियामधील पराभवानंतर मी पुढे जाण्याचा निर्धार केला होता. फ्रेंच ओपनमध्ये पुन्हा तसाच प्रसंग घडला. त्यामुळे अमेरिकन ओपनमध्ये विजय मिळवण्याची शपथ घेतली होती आणि ती पूर्ण झाल्याचा मला अभिमान आहे.’
सबालेंकाने आपल्या कारकीर्दीतील चौथा ग्रॅण्डस्लॅम आणि सलग दुसरे अमेरिकन ओपन ट्रॉफी जिंकत इतिहासात आपले नाव कोरले.