
टेनिसचा दिग्गज नोव्हाक जोकोविच अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत पराभूत झाला असला तरी 25व्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदासाठीची त्याची जिद्द अजूनही तितकीच कायम आहे. कार्लोस अल्कराझविरुद्धच्या लढतीत काही क्षणी तो वरचढ दिसला, मात्र अखेरीस त्याला सरळ सेट्समध्ये पराभव पत्करावा लागला.
जोकोविचने सामन्यानंतर ठामपणे सांगितले, ‘मी आता मागे हटणार नाही. ग्रॅण्डस्लॅम जिंकण्यासाठी माझी धडपड सुरूच राहील. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी मी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करेन. अजून किमान एक तरी ट्रॉफी जिंकण्यासाठी माझी लढाई सुरुच राहील.’
38 वर्षीय जोकोविचने या हंगामात सर्व चार ग्रॅण्डस्लॅम स्पर्धांच्या उपांत्य फेरीत मजल मारली, पण प्रत्येक वेळी त्याला थांबावे लागले. त्यातील तीनदा 22 वर्षीय अल्कराझने तर एकदा 24 वर्षीय यानिक सिनरने त्याचा पराभव केला.
उपांत्य फेरीबद्दल बोलताना जोकोविच म्हणाला, दुर्दैवाने दुसऱ्या सेटनंतर माझी ऊर्जा संपली. दोन सेटपर्यंत मी त्याचा खेळ रोखू शकलो, पण त्यानंतर पूर्णपणे थकलो आणि तो सातत्याने चांगले खेळत राहिला. जोकोविचचे रौप्य महोत्सवी ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. पण हार न मानता ते साकार करण्यासाठी त्याची जिद्दीची लढाई अजूनही कायम आहे