
शहरात बॉम्बस्पह्टाची धमकी देणाऱयाला गुन्हे शाखेने अटक केली. अश्विनी कुमार सुप्रा असे त्याचे नाव आहे. त्याला पुढील तपासासाठी वरळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मित्राचा सूड घेण्यासाठी त्याने धमकीचा खोटा मेसेज पाठवल्याचे तपासात समोर आले आहे.
अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला 34 गाडय़ांमध्ये मानवी बॉम्बच्या सहाय्याने बॉम्बस्पह्टाची मालिका घडवणार असल्याचा मेसेज वरळी वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आला होता. तसेच 14 अतिरेकीदेखील मुंबईत घुसले आहेत. बॉम्बस्पह्टासाठी 400 किलो आरडीएक्सचा वापर होणार असून एक कोटीहून अधिक नागरिकांना मारण्याचे टार्गेट आहे, असे त्यात म्हटले होते.
‘लष्कर ए जिहादी’ असा उल्लेख करून बॉम्बस्पह्ट रोखता येईल तर रोखून दाखवाच. आम्ही जागोजागी बॉम्बस्पह्ट घडवणार आहोत. फिरोज नावाचा एक अतिरेकी असल्याचे त्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले होते. त्या मेसेजचा गुन्हे शाखा आणि एटीएसने तपास सुरू केला. तो धमकीचा मेसेज नोएडा येथून आल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांचे पथक नोएडा येथे गेले. तेथून पोलिसांनी अश्विनी कुमारला ताब्यात घेतले. अश्विनी कुमारचा फिरोज नावाचा मित्र आहे. त्याच्यामुळे अश्विनी कुमारला तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्याचा सूड घेण्यासाठी अश्विनी कुमारने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.
विमानतळ, नायर रुग्णालय उडवून टाकू
शनिवारी रात्री नायर रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या ई-मेलवर आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्पह्टाच्या धमकीचा मेसेज आला. या प्रकरणी सहार आणि आग्रीपाडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
शुक्रवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक ई-मेल आला. त्या ई-मेलमध्ये विमानतळावर बॉम्बस्पह्ट करणार असल्याचे नमूद केले होते. त्या माहितीनंतर बॉम्ब शोधक व नाशक (बीडीडीएस) चे पथक घटनास्थळी गेले. तेथे तपासणी केल्यावर ती अफवा असल्याचे उघड झाले.
शनिवारी रात्री अनेक मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. तेव्हाच नायर रुग्णालयाच्या ई-मेलवर एक ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली. रुग्णालयात बॉम्बस्पह्ट होणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. याची माहिती आग्रीपाडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तपासणी केल्यावर ती अफवा असल्याचे उघड झाले.