दुलीप करंडकाच्या दोन्ही उपांत्य लढती ड्रॉ, दक्षिण विभाग अन् मध्य विभाग जेतेपदासाठी भिडणार

दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील दोन्ही उपांत्य सामने अखेर ड्रॉ झाले. मात्र पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर साऊथ विभाग आणि मध्य विभाग या संघांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता 11 ते 15 सप्टेंबरदरम्यान बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर या उभय संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे.

दक्षिण विभागाने उत्तर विभागाविरुद्ध पहिल्या डावात 175 धावांची आघाडी घेतली, तर मध्य विभागाने पश्चिम विभागाविरुद्ध पहिल्या डावात 600 धावा करत 162 धावांची आघाडी मिळवली. चारही संघांच्या कर्णधारांच्या परस्पर संमतीने सामने ड्रॉ घोषित करण्यात आले.

दक्षिण विभागाकडून पहिल्या डावात 197 आणि दुसऱ्या डावात नाबाद 52 धावा करणाऱ्या नारायण जगदीसनला ‘सामनावीर’ पुरस्कार मिळाला. दुसऱ्या सामन्यात हा पुरस्कार सारांश जैनला मिळाला. त्याने पहिल्या डावात 3 गडी बाद केले, तर दुसऱ्या डावात नाबाद 63 धावा झळकावत 5 बळी घेतले. सामना थांबवण्यात आला तेव्हा दक्षिण विभागाने दुसऱ्या डावात 1 बाद 95 धावा केल्या होत्या. नारायण जगदीसन 52 आणि देवदत्त पडिक्कल 16 धावांवर नाबाद होते. दुसऱ्या सामन्यात पश्चिम विभागाने 8 बाद 216 धावा केल्या. तनुष कोटियान 40 धावांवर नाबाद होता.

पश्चिम विभाग विरुद्ध मध्य विभाग मध्य विभागाच्या 5 फलंदाजांची अर्धशतके

मध्य विभागाचा पहिला डाव रविवारी चौथ्या दिवशी 164.3 षटकांत 600 धावांवर संपुष्टात आला. यात दानिश मालेवर (76), शुभम शर्मा (96), कर्णधार रजत पाटीदार (77), उकेंद्र यादव (87) आणि हर्ष दुबे (75) या पाच फलंदाजांनी अर्धशतके ठोकली. त्याआधी, पश्चिम विभागाने नाणेफेक जिंपून फलंदाजी करताना पहिल्या डावात 438 धावा केल्या होत्या. यात ऋतुराज गायकवाडने 184 धावांची भक्कम खेळी करत संघाला सावरले. त्याने 25 चौकार लगावले. तनुष कोटियानने 76 आणि शार्दुल ठापूरने 64 धावा करत अर्धशतक ठोकले. पश्चिम विभागाकडून धर्मेंद्रसिंह जडेजाने 4 बळी घेतले, तर मध्य विभागाकडून सारांश जैन आणि हर्ष दुबे यांनी 3-3 बळी टिपले. अखेरच्या निकालानुसार मध्य विभागाने पहिल्या डावातील 162 धावांच्या आघाडीच्या जोरावर अंतिम फेरी गाठली.

उत्तर विभाग विरुद्ध दक्षिण विभाग शुभमचे शतक, निशांत सिंधूचे अर्धशतक

चौथ्या दिवशी उत्तर विभागाने पहिल्या डावातील 5 बाद 278 धावसंख्येवरूनपुढे खेळायला सुरुवात केली. त्यांचा पहिला डाव 100.1 षटकांत 361 धावांवर संपुष्टात आला. शुभम खजुरिया 128 धावांवर बाद राहिला. त्याच्यासह निशांत सिंधूने अर्धशतक ठोकले. तो 82 धावांवर गुरजपनीत सिंगकडून बाद झाला. आयुष बडोनी 40, यश ढुल 12 आणि कर्णधार अंकित पुमार 6 धावांवर बाद झाले. त्याआधी, दक्षिण विभागाने दुसऱ्या दिवशीच 536 धावा करून पहिला डाव संपवला होता. यष्टिरक्षक फलंदाज नारायण जगदीसनने 197 धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कल (57) आणि रिकी भुई (54) यांनीही अर्धशतक ठोकले. तन्मय अग्रवाल (43) व जगदीसनने 103 धावांची शतकी भागीदारी केली होती. जगदीसन दुहेरी शतकाच्या उंबरठय़ावर असताना 197 धावांवर धावचीत झाला. उत्तर विभागाकडून निशांत सिंधूने 5 बळी टिपले.  मग दक्षिण विभागाने 24.4 षटकांत 1 बाद 95 धावसंख्येपर्यंत मजल मारलेली असताना हा सामना दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या मान्यतेने ड्रॉ करण्यात आला. दक्षिण विभागाने पहिल्या डावातील 175 धावांच्या आघाडीच्या जोरावर अंतिम फेरीत धडक दिली.