
गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. आणि निर्माल्यापासून खत बनवूया, असा निर्धार करत ठाणेकरांनी पर्याव-रणाचा वसा जपला आहे. यंदाच्या वर्षी ठाणेकरांनी निर्माल्य संकलन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून विसर्जन घाटांवर उभारलेल्या कलशांमधून तब्बल 73 टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. या निर्माल्यापासून बायो कंपोस्टिंग पद्धतीने खत करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या खत प्रकल्पात निर्माल्य जमा करण्यात आले.
ठाणे पालिकेच्या हद्दीतील कोलशेत, कौसा, ऋतू पार्क येथे हे बायोकंपोस्टिंग प्रकल्प उभारण्यात आले आहेत. अखेरच्या दिवशी मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे 32 टनांहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. तसेच निर्माल्यांतील अविघटनशील घटकांचे वर्गीकरण करून ते पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत. दीड दिवसाच्या मूर्ती विसर्जनानंतर 15 टन एवढे निर्माल्य जमा झाले. तर पाचव्या दिवशी 6 टन निर्माल्य जमा झाले होते. सातव्या दिवशी 16 टन निर्माल्य जमा झाले. यावर्षी एकूण 73 टन निर्माल्य जमा झाले. त्याचबरोबर दोन टनांहून अधिक प्लास्टिक जमा झाले.
प्लास्टिक, थर्माकोलचा वापर कमी
पालिकेच्या जनजगृतीमुळे सजावट आणि देखाव्यांसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक व थर्माकोलचा वापर कमी झाला आहे. व्यापक जनजागृती केल्यामुळे यंदा त्याचा वापर 95 टक्कांनी कमी झाला आहे. यासोबत शाडू मातीच्या मूर्ती वापरणे, मूर्तीचा आकार लहान ठेवणे, घरच्या घरी तसेच सोसायटीत अथवा कृत्रिम तलावामध्ये गणेशमूर्ती विसर्जित करणे अशा विविध योजना राबवल्यामुळे ते शक्य झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
खताचा वापर पालिका उद्यानात
ठाणे पालिकेच्या खत प्रकल्पात संकलित केलेल्या निर्माल्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याचे खत तयार केले जाणार आहे. या तयार केलेल्या खताचा वापर पालिकेच्या उद्यानांमध्ये केला जाणार आहे. तसेच यावर्षी असंख्य भाविकांनी छोट्या मूर्तीही खाडीत विसर्जन करण्याचा आग्रह धरला होता. मात्र कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी पालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात आल्यानंतर मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले.