
इलेक्ट्रोल बाँडच्या माध्यमातून भाजपला मदत करणाऱया मेधा इंजिनीयरिंग कंपनीचा 90 कोटी रुपयांचा दंड माफ केल्याचा मुद्दा पेटला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप फेटाळल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तात्काळ एक लेखी पुरावा सोशल माध्यमावरून समोर आणला आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांचे पितळ उघडे पडल्याचे बोलले जात आहे.
मेधा इंजिनीयरिंग कंपनीचा 90 कोटी रुपयांचा दंड माफ करण्याच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले होते.
नेमका प्रश्न काय होता?
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांना प्रश्न विचारला होता. शेगाव व पंढरपूर या पालखी दिंडी मार्गाचे काम मेधा इंजिनीयरिंग लि. कंपनीकडे दिले असून जिल्हाधिकारी व आयुक्त कार्यालयाने या कंपनीला मुरुम, वाळू, दगड चोरीप्रकरणी दोषी ठरवून सुमारे 51 कोटी 70 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला होता हे खरे आहे काय? असल्यास उक्त कंपनीकडून शासकीय स्तरावर संपर्क साधून 51 कोटी 70 लाख रुपयांच्या वसुलीसंदर्भात स्थगिती मिळवण्याचे आदेश मिळवले. दंडात्मक रकमेऐवजी 1 टक्क्याप्रमाणे केवळ 5 लाख 17 हजार रुपये इतकी दंडाची रक्कम भरण्यास मंजुरी देण्यात आली हे खरे आहे काय?
विधानसभेतील उत्तराचे पुरावेच सादर केले
मी पुराव्याशिवाय बोलत नाही, असे सांगत रोहित पवार यांनी महसूल मंत्र्यांच्याच एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तराची प्रतच समोर आणली. त्यात त्यांनी म्हटले, ‘तुमच्याच पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी 11 जुलै 2025 रोजी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला तुम्ही स्वतः महसूल मंत्री म्हणून उत्तर दिले आहे. तुम्ही केवळ दंड माफ केला नाही, तर जप्त केलेले साहित्यही परत करण्याचे आदेश दिले होते, सामान्य नागरिक मुरूम काढतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई केली जाते, मात्र धनदांडग्यांनी अवैध उत्खनन केले असतानाही कोटय़वधींचा दंड माफ केला जातो’, असा गंभीर आरोप त्यांनी केला. ‘राजकीय संन्यास घेण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत आहे का?’ असे थेट आव्हान देत रोहित पवार यांनी महसूल मंत्र्यांना कोंडीत पकडले.
आदरणीय बावनकुळे साहेब,
मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही…हा घ्या पुरावा …
तुमच्याच पक्षाचे आमदार मा.बबनराव लोणीकर यांनी 11 जुलै 2025 रोजी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला तुम्ही स्वतः महसूल मंत्री म्हणून उत्तर दिले आहे….
दिलेले उत्तर आणि प्रश्न तुम्हीच बघा, तुम्ही… https://t.co/m1o6HcdzkC pic.twitter.com/qrSdQdEzPa
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 8, 2025