विसर्जनावेळी साकीनाक्यात झालेल्या दुर्घटनेची चौकशी करा! गणेशोत्सव समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विसर्जनावेळी साकीनाका खैराणी मार्गावर झालेल्या दुर्घटनेत ट्रॉलीला हाय टेन्शन वायरमधून शॉक बसला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले. विसर्जन मार्गावर अशाप्रकारे हायटेन्शन वायर असतील तर तिथे खबरदारी घेणे आवश्यक होते. पण तसे झालेले दिसत नाही, असा आरोप करत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने या घटनेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

साकीनाका परिसरात खैराणी मार्गावर श्री गजानन मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक जात असताना ट्रॉलीला हाय टेन्शन वायरचा शॉक लागला. या दुर्दैवी घटनेत बिनू शिवकुमार (36) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच तुषार गुप्ता (18), धर्मराज गुप्ता (44), आरुष गुप्ता (12), शंभू कामी (20) आणि करण कानोजिया (14) हे चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विसर्जन मार्गावर अशा प्रकारे हायटेन्शन वायर असतील तर तिथे खबरदारी घेणे आवश्यक होते. मात्र तसे झालेले दिसत नाही. सदर घटनेची पालिका, पोलीस आणि वाहतूक पोलीस, बेस्ट, टाटा पॉवर, महावितरण आणि इतर यंत्रणांसोबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे तसेच मृत तरुणाच्या वारसांना आणि जखमींना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केली आहे.

सार्वजनिक उत्सवात अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी मुंबई आणि उपनगरातील विसर्जन स्थळांच्या मार्गावरील उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांचे सर्वेक्षण करावे, जेणेकरून आगामी नवरात्रोत्सवात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, अशी मागणीही अॅड. दहिबावकर यांनी केली.