
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मधील पाच हजार 831 दूध संस्थांसाठी तीन कोटी 74 लाखांचे विनाटेंडर खरेदी केलेले जाजम, घड्याळ हे भ्रष्टाचार करण्यासाठीच होते. यामधून एक कोटी 82 लाखांहून अधिक रकमेच्या घोटाळ्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, याप्रकरणी विभागीय उपनिबंधकांकडून चौकशीसाठी नियुक्त केलेले अधिकारी गोसावी यांनी राजकीय दबाव न घेता दोषींवर कारवाई करावी. तसेच महायुतीचा अध्यक्ष म्हणून महायुती सरकारने ज्या पद्धतीने हस्तक्षेप केला, त्याच पद्धतीने ‘गोकुळ’चे सर्व संचालक मंडळ बरखास्त करून त्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी अवधूत साळोखे, महिला आघाडीच्या स्मिता सावंत-मांडरे, मंजित माने आदी उपस्थित होते.
संस्थांसाठी तीन कोटी 84 लाखांचे जाजम व घड्याळ भेटवस्तू सत्तेचा दुरुपयोग करून निविदा न काढताच देण्यात आल्या. जर टेंडर काढले असते, तर पुरवठादार कंपन्यांमध्ये थेट स्पर्धा झाल्या असत्या. पण कोणाच्या तरी फायद्यासाठीच विनाटेंडर ही खरेदी चढ्या दराने करण्यात आली. पावणेचार कोटींचे जाजम व घड्याळ सध्याच्या बाजारभावात अत्यंत कमी किमतीत असून, सध्याच्या बाजारभावात केलेल्या चौकशीत यामध्ये सुमारे एक कोटी 82 लाख 27हजारांहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर येत असल्याचा आरोप करीत, ते घोटाळेबाज कोण? केलेली खरेदी का लपवत आहेत? आदी सवालही संजय पवार आणि विजय देवणे यांनी उपस्थित केले.
गोकुळ दूध संघ हा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा असून, तो राजकीय अड्डा बनत चालला आहे. यातूनच मेडिटेशनसाठी संचालकांची सहकुटुंब गोवा येथे फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये सहल, पशुखाद्य घोटाळा ते जाजम व घड्याळ खरेदी, सुगंधी दूध, टँकर आदी मार्गांनी संचालक मंडळाकडून ‘गोकुळ’च्या आजपर्यंतच्या शिस्तबद्ध कारभाराला फटका बसत आहे. शिवसेनेच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे सध्या दुग्ध विभागाकडून या विनाटेंडर जाजम, घड्याळ खरेदी प्रकरणाची चौकशी होत असली, तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांसह ‘गोकुळ’च्या विरोधी गटाच्या नेत्यांनीही यावर उद्याच्या सर्वसाधारण सभेत आवाज उठविणे गरजेचे असल्याचे संजय पवार म्हणाले.