उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक का होत आहे? धनखड गेले कुठे? काँग्रेसची सरकारवर प्रश्नांची सरबत्ती

उपराष्ट्रपतीपदासाठी आज मतदान सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसने पुन्हा एकदा माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यावर टीका केली आहे. धनखड यांनी अचानकच आरोग्याचे कारण देत पदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी उपराष्ट्रपतींच्या पोटनिवडणुकीच्या दिवशीच सोशल मीडियावर लिहित धनखड यांच्यावर टीका केली आहे. म्हटले की, गेल्या 50 दिवसांपासून जगदीप धनखड यांनी मौन साधलं आहे असे जयराम रमेश म्हणाले

रमेश यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, आज धनखड यांच्या उत्तराधिकारीसाठी निवडणूक सुरू झाली आहे, तरीदेखील संपूर्ण देश धनखड काहीतरी बोलतील याची वाट पाहत आहेत. उपराष्ट्रपती पदाचा अनपेक्षित राजीनामा दिल्यानंतर त्यांनी हे मौन स्विकारले आहे.

काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले की, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक का होत आहे? आपले जे माजी उपराष्ट्रपती आहेत ते कुठे आहेत? कोणत्या कारणांमुळे ते अचानक गायब झाले? हा एक मोठा रहस्यमय प्रकार आहे. याबाबत सरकारने देशाला सांगायला हवे की असे का झाले. मी त्यांना खूप दिवसांपासून ओळखतो, ते खूप स्पष्टवक्ते आहेत. मग विनाकारण ही पोटनिवडणूक का होत आहे असेही पायलट म्हणाले.

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्य कारणांचा दाखला देत राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता. त्यानंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेतली जात आहे. एनडीएने या निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे, तर इंडिया आघाडीने बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. दोघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. आज म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी मतदान होत आहे आणि सायंकाळपर्यंत निकालही जाहीर होणार आहेत.