मुंबई-गोवा महामार्गावर ट्रेलरला अपघात; चालक गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर मुंबई ते गोवा जाणारा 18 चाकी ट्रेलर उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने आल्याने येथील तीव्र वळणावर उलटला. यात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला. दरम्यान, ट्रेलर चालकाला येथील कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तेजस नलावडे, पोलीस हवालदार मिठबावकर, वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, दिलीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला झाला. दरम्यान, उलटलेला ट्रेलर क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या क्रेनला पाचारण करण्यात आले होते.