
मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात एलएलएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाद्वारे सीईटी घेण्यात येते. या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 26 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, गणेशोत्सवामुळे अनेक विद्यार्थी मूळ गावी गेल्यामुळे इच्छा असूनही अनेकांना अर्ज भरता आला नाही. या पार्श्वभूमीवर सीईटी परिक्षेकरिता अर्ज भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी आग्रही मागणी युवासेना तसेच शिव विधी व न्याय सेनेच्यावतीने मुंबई विद्यापीठाकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात एलएलएम प्रवेश परीक्षा मुंबई विद्यापीठाद्वारे घेण्यात येणार आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन शिवसेना अंगीकृत संघटना शिव विधी व न्याय सेना यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. या शिबिरावेळी अनेक विद्यार्थ्यांनी विनंती केल्यामुळे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत व माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठ कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांना निवेदन दिले. गणेशोत्सवासाठी अनेक विद्यार्थी आपल्या मूळगावी गेल्यामुळे सदर अर्ज भरू शकले नाहीत. त्यामुळे किमान तीन दिवस अर्ज भरण्यास मुदतवाढ देऊन परीक्षा पुढे घेण्याची विनंती या निवेदनाव्दारे करण्यात आली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. याबाबत शिव विधी व न्याय सेनेचे अध्यक्ष ऍड. नितीश सोनावणे यांनी देखील निवेदन दिले आहे.