
आशिया कपमध्ये येत्या 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध क्रिकेटयुद्ध भडकणार आहे. पण त्या महासंग्रामापूर्वी हिंदुस्थानी संघाने आपली शस्त्रं धारदार करण्याची तयारी सुरू केली आहे. 10 सप्टेंबरला म्हणजेच बुधवारी यूएईविरुद्ध होणारा सामना म्हणजे जणू युद्धभूमीवर उतरण्यापूर्वीची अंतिम कवायत. हिंदुस्थानसाठी हा सामना केवळ दोन गुणांसाठी नाही, तर रणनीती तपासण्यासाठी, संयोजन जुळवण्यासाठी आणि प्रत्येक खेळाडूची ताकद तपासण्यासाठी आहे. दुबईतील हा सामना म्हणजे पाकिस्तानी फौजेवर धडक देण्यापूर्वीची ड्रेस रिहर्सल’च मानली जात आहे.
यजमान यूएई कागदावर कमकुवत वाटत असला तरी त्यांच्याविरुद्ध खेळणे हिंदुस्थानी संघासाठी आत्मविश्वास वाढवणारे ठरू शकते. जसप्रीत बुमरा, हार्दिक पंडय़ा यांसारखे धुरंधर आपली धार दाखवतील, तर शुभमन गिल-तिलक वर्मा- सूर्यकुमार यादव यांची फलंदाजी म्हणजे आगामी लढतीची रंगीत तालीमच असेल.
हिंदुस्थानचे अभियान विजयानेच सुरू होणार यात तीळमात्र शंका नाही. तरीह संभाव्य विजेत्यांना अद्याप अंतिम 11 संघ ठरवणे कठीण होतेय. संघ व्यवस्थापनासमोर मोठा प्रश्न असा आहे की तिसऱ्या फिरकीपटूला संधी द्यावी की एखाद्या तज्ञ वेगवान गोलंदाजाला उतरवावे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यकाळात सर्व फॉरमॅटमध्ये अष्टपैलू खेळाडूंवर भर दिला गेला आहे, ज्यामुळे फलंदाजीची खोली आठव्या क्रमांकापर्यंत वाढविण्याची प्रथा सुरू झालीय. उद्या या प्रथेला थोडासा ब्रेक मिळू शकतो.
संघ संतुलनासाठी अष्टपैलू महत्त्वाचे
फलंदाजीत शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा सलामीसाठी सज्ज आहेत. तिलक वर्माने तिसऱ्या क्रमांकावर स्वतःची जागा पक्की केली आहे, तर कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. त्यानंतर हार्दिक पंडय़ा व शिवम दुबे/रिंकू सिंह यांच्याकडे अष्टपैलू खेळाडू म्हणून दुहेरी जबाबदारी असू शकते.
संजूला न्याय मिळणार?
यष्टिरक्षकाच्या भूमिकेत जितेश शर्मा आघाडीवर दिसत आहेत. मात्र संजू सॅमसनला सलामीवीर म्हणून खेळवावे, असाही सूर निघतोय. पण गिलच्या पुनरागमनामुळे तो सलामीला उतरण्याचीच अधिक शक्यता आहे. त्यामुळे या स्थितीत संजूला न्याय मिळण्याची शक्यता कमीच आहेत. तरीही प्रयोग असलेल्या सामन्यात त्याला खेळवण्याची शक्यताही मानली जात आहे.
गोलंदाजीतील पेच
वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमरा व अर्शदीप सिंह निश्चित मानले जातात. तिसर्या स्थानासाठी संघ व्यवस्थापनाला निर्णय घ्यावा लागणार आहे. खेळपट्टीचा रागरंग पाहता वेगवान गोलंदाजांना फायदा होऊ शकतो, परंतु फिरकीच्या ताफ्यात अक्षर पटेलसोबत कुलदीप यादव किंवा वरुण चक्रवर्ती यापैकी एकाला आपली कमाल दाखवण्याची संधी मिळू शकते.
असा असेल संघ
हिंदुस्थान ः सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंडय़ा, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), शिवम दुबे/रिंकू सिंह, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव/वरुण चक्रवर्ती.
संयुक्त अरब अमीरात ः मुहम्मद वसीम (कर्णधार), अलीशान शराफू, आसिफ खान, अर्यांश शर्मा, राहुल चोपड़ा (यष्टिरक्षक), सिमरनजीत सिंह, ध्रुव पराशर, जुनैद सिद्दिकी, मुहम्मद जवादुल्लाह, मुहम्मद फारुक, मतीउल्लाह खान.