ठाण्यातील रावणाच्या अहंकाराचे दहन करावेच लागेल, गणेश नाईकांचा रोख कुणाकडे?

ठाणे महापालिकेत सत्ता आणायची असेल तर ठाण्यातील रावणाच्या अहंकाराचे दहन करावेच लागेल, असे आव्हानच राज्याचे वनमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांनी दिले. त्यामुळे गणेश नाईक यांचा रोख कुणाकडे याची चर्चा ठाणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ठाण्यातील भाजप कार्यालयात पदाधिकारी व माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. या वेळी गणेश नाईक यांनी आपल्या भाषणात सडेतोड भूमिका मांडली. ते म्हणाले, आगामी पालिका निवडणूक भाजपने स्वबळावर लढवण्याचा निर्धार केला असून ही निवडणूक जिंकायची असेल तर रावणाच्या अहंकाराचे दहन करण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहनही त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.

…तर मी युतीला पहिला विरोध करेन

नवी मुंबई महापालिकेत मी भाजपला सत्ता मिळवून दिली. आता ठाण्यातही सत्ता मी आणू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल, असे नाईक यांनी बैठकीत स्पष्ट केले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात युतीचा आग्रह धरला आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मान राखला गेला नाही तर या युतीला पहिला विरोध करणारा मी असेन, असेही त्यांनी सांगितले.