
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याने त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याबाबतचे निवेदन जारी केले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढले. ते रालोआचे उमेदवार होते. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्या.बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर निवड झाल्याने राधाकृष्णन यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपविला आहे. आचार्य देवव्रत आता गुजरातसोबत महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचाही कार्यभार पाहणार आहेत. आचार्य देवव्रत हे मूळचे हरयाणातील समालखा येथील आहेत. गुजरातचे राज्यपाल होण्याआधी ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते.