
लाडकी बहीण योजनेतून 26 लाख अपात्र महिला सापडल्या होत्या. आता लाडकी बहीण योजनेनंतर आणखी एका योजनेत लाखो अपात्र लाभार्थी सापडले आहेत. यामुळे सरकारला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला होता.
हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून 79 हजार शेतकरी अपात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना सरकारकडून महिन्याला 500 रुपये दिले जात होते. अपात्र लाभार्थ्यांमुळे गेल्या दोन ते सव्वा दोन वर्षात राज्य सरकारला 110.06 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या केंद्रपुरस्कृत योजनेअंतर्गत तपासणीखाली असलेल्या 1.44 लाख लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारला पाठवली. राज्य सरकारने हीच यादी एप्रिल 2023 मध्ये सुरू झालेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठीही वापरली. त्यातच हे लाभार्थी अपात्र असल्याचे समोर आले आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून 1.44 लाख नावांपैकी 79 हजार नावे वगळण्यात आली आहेत. कारण हे शेतकरी त्यांच्या पत्नींच्या नावाने देखील रोख लाभ घेत होते. ही यादी दोन्ही योजनांसाठी समान आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकरी प्रतिमहिना 1,000 रुपये घेत होता. प्रत्येक योजनेतून दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2 हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. अलीकडेच फडणवीस यांनी या योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी 1 हजार 892.61 कोटी रुपये वितरित केल्याची घोषणा केली होती.