
भाजप आपली मूळ विचारसरणी विसरली आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच आज खरी भाजप सत्तेत नाहिये, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.
मुंबईत माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एल्फिन्स्टन पुलाजवळ आमचे आंदोलन सुरू आहे. यावर आम्ही वारंवार आवाज उठवला आहे. वरळी शिवडी कनेक्टरची मागणी आमची होती आमची सत्ता असताना त्याचे 70 टक्के ते काम पुर्ण झालं. एल्फिन्स्टन पुल पाडण्यापूर्वी तिथे दोन गोष्टींचा निकाल लागणं गरजेचं आहे. प्रथम ज्या आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत, त्यांना तिथल्या तिथेच पुर्नवसन करून मिळावे अशी आमची मागणी आहे. सरकारने याचा पक्का निर्णय घ्यावा आणि कागदोपत्री आम्हाला द्यावा. या सरकारवर आमचा विश्वास नाही. वरळी शिवडी कनेक्टरचे काम पूर्ण झाल्यावरच हा पूल तोडावा, त्या आधी नाही. तसे झाल्यास रहदारीचा सामान्य जनतेला खूप त्रास होईल असे आदित्य ठाकरे म्हणाले.
तसेच भारत पाकिस्तान सामन्याबद्दल आम्ही प्रश्न विचारतोय की केंद्र सरकार यावर गप्प का आहे? जगभरात नेते पाठवले, त्यात खासदारांचा समावेश होता. ऑपरेशन सिंदूर काय होतं, या हल्ल्यामागे पाकिस्तान आणि चीन कसा आहे हे आपण संपूर्ण जगाला सांगितलं. पण कदाचित दुर्दैवं हे आहे की जी खरी जी भाजप होती, ती सत्तेत नाहिये. भाजपने आपली विचारधारा बदललेली आहे, हे देशाचं दुर्दैवं आहे. आज खरी भाजप सत्तेत असती तर त्यांनी बीसीसीआयला प्रश्न विचारला असता की पाकड्यांसोबत खेळायची तुमची हिंमत कशी काय होते? पण आज बीसीसीआय पैश्यांचे लालुच दाखवून ज्या देशाने आपल्यावर हल्ला केला, आपल्या माता भगिनींचे कुंकू पुसलं, त्याच पाकड्यांसोबत बीसीसीआय क्रिकेट खेळत आहे हे दुर्दैवं आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
 
             
		




































 
     
    


























