
महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री नदीचे तसेच लगतच्या खाडीचे पाणी पुन्हा एकदा प्रदूषित झाल्याचे चित्र समोर आले आहे. रात्रीचा फायदा घेऊन टँकरमधून रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याने सावित्रीची लाल खाडी आता काळी झाली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, प्रदूषण विभागाच्या दुर्लक्षामुळेच सावित्री नदीचा ऱ्हास होऊ लागला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाही. गेल्या दोन दिवसांपासून महाडजवळून वाहणारी सावित्री नदी आणि ल गतच असलेली खाडी प्रदूषित झाली आहे. पावसामुळे गढूळ झालेले सावित्री नदीचे पाणी अचानक लाल झाल्याचे दिसून आले आहे. महाडपासून थेट खाडीपर्यंतचे पाणी प्रदूषित झाल्याने पावसाच्या संधीचा फायदा घेत पाणी सोडले जाते. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडून सांडपाणी सोडून दिले जात असल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
गेली अनेक वर्षे कारवाया होऊनही महाड औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडून नदी-खाडी प्रदूषित करण्याचे प्रकार सुरूच राहिल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी आहे. याप्रकरणी जागृत नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. मासेमारीवर उपजीविका करणाऱ्या मच्छीमारांचे मोठे नुकसान होत असून दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती आहे.