खालापुरात अदानीच्या स्मार्ट मीटरला कडाडून विरोध, ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले

अदानी समूहाच्या ठेकेदाराकडून लावण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला खालापूर तालुक्यातून कडाडून विरोध करण्यात आला आहे. ग्रामस्थांची परवानगी न घेता हे मीटर लावले जात असल्याने घोडीवली-नावंढे परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि हे मीटर लावणे थांबवले नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला.

खालापूर तालुक्यात वीजग्राहकांच्या माथी महावितरण कंपनीने स्मार्ट मीटर मारण्याचा घाट घातला आहे. हे स्मार्ट मीटर लावण्याचे काम अदानी कंपनीला देण्यात आले आहे. अदानी कंपनीचा ठेकेदार मनमानी कारभार करत ग्राहकांना विश्वासात न घेता परस्पर स्मार्ट मीटर लावत असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. घोडीवली, नावंढे परिसरात काही ग्राहकांच्या घरी परस्पर मीटर लावण्याचे निदर्शनास येताच सर्व ग्राहक आक्रमक झाले. त्यांनी आज महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली आणि स्मार्ट मीटरला विरोध केला. अधिकाऱ्यांना धारेवर धरत कोणत्याही प्रकारे स्मार्ट मीटर लावू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते किरण हाडप, तुळशीराम पाटील, रामदास फावडे, दिलीप हाडप, नरेश हाडप आदी उपस्थित होते. फॉल्टी मीटरच्या नावाखाली सरसकट स्मार्ट मीटर बसविले जात असतील तर हे खपवून घेणार नाही. जे घरगुती मीटर आहेत ते ग्राहकांच्या परवानगीशिवाय काढू नका, असा इशारा दिला आहे.