शिवसेनेच्या शिवालयसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ऑफिसचा भूखंड आरबीआयच्या घशात, महायुती सरकारकडून विरोधी पक्षांच्या नरीमन पॉइंट येथील कार्यालयांच्या जागेची विक्री

मंत्रालयाच्या समोरील जागेत शिवसेनेच्या शिवालय पक्ष कार्यालयासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप अशा विविध राजकीय पक्षांची कार्यालये होती. मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पामुळे सरकारच्याच विनंतीवरून ही पक्ष कार्यालये तात्पुरती स्थलांतरित करण्यात आली होती. पण आता महायुती सरकारने या मोक्याच्या जागेची परस्पर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या जागेच्या व्यवहारात राज्य सरकारचे 1800 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

मंत्रालयाच्या समोरील नवीन प्रशासकीय इमारत आणि सचिवालय जीमखाना परिसरात शिवालय तसेच आरपीआय गट, काँग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांची कार्यालये होती. मेट्रोच्या कामासाठी सरकारच्याच  विनंतीवरून ही राजकीय कार्यालये  तात्पुरती स्थलांतर करण्यात आली. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच जागी सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन एमएमआरसीएलने  दिले होते. आता मात्र त्यांनी दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे. राजकीय पक्षांशी कोणतीही चर्चा न करता ही जागा परस्पर रिझर्व्ह बँकेला विकण्यात आली. 5 सप्टेंबर रोजी या व्यवहाराची नोंदणी करण्यात आली, असा आरोप काँग्रेसचे प्रवत्ते सचिन सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

मुंबई मेट्रो टप्पा-3चे काम पूर्ण झाल्यानंतर फ्री प्रेस जर्नल मार्गावरील त्याच जागेत नव्याने कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करून राजकीय पक्षांना  कार्यालये देण्याची आवश्यक ती कार्यवाही करावी, असा शासन आदेश 21 ऑक्टोबर 2015 रोजी काढण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मेट्रोच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात कार्यालय हस्तांतरीत करावे, असे पत्र 2 डिसेंबर 2016 रोजी काँग्रेस पक्षाला दिले होते, याकडे सचिन सावंत यांनी लक्ष वेधले.

काँग्रेसचा कोर्टात जाण्याचा इशारा

नरिमन पॉइंट येथील 4.2 एकर जागेची विक्री रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला केली. त्यामुळे राजकीय पक्ष कार्यालयांना कायमचे विस्थापित होण्याची वेळ आली आहे. जागाविक्रीचा हा व्यवहार रद्द करून नरिमन पॉइंट येथील पूर्वीच्याच जागी पक्षाला कार्यालय बांधून देण्याची हमी द्यावी, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने सचिन सावंत यांनी दिला आहे.

सरकारचा महसूल बुडाला

नरिमन पॉइंट येथील या जागेचे बाजारमूल्य 5 हजार 200 कोटी रुपये आहे. पण 3 हजार 400 कोटी रुपयांना हा व्यवहार करून 1 हजार 800 कोटी रुपयांचे नुकसान झाले याकडे सचिन सावंत यांनी लक्ष वेधले.