महाराष्ट्रात आज-उद्या मुसळधार; कोकणात अतिवृष्टीचा धोका

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांत आजपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. 14 आणि 15 सप्टेंबर रोजी कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा धोका आहे. मराठवाडा आणि विदर्भ या भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य आणि शेजारील वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही अतिवृष्टीची शक्यता आहे. या मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढण्याचा आणि शहरी भागांत पाणी साचण्याचा धोका हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.

शेतकरी, नागरिकांनी सावधानता बाळगावी

या काळात विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि अल्पावधीत मोठा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनात आणि नागरिकांना वाहतूक व दैनंदिन जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो, यामुळे सावधानतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

परभणी आणि हिंगोलीला सतर्पतेचा इशारा

परभणी जिह्यातील परभणी तालुका, पूर्ण आणि पालम तालुक्याला सतर्पतेचा इशारा दिला आहे. हिंगोली जिह्यातील कळमनुरी आणि औंढा तालुक्याला सतर्पतेचा इशारा देण्यात आला आहे.

रायगड, सातारा, पुण्यातऑरेंज अलर्ट

वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार रायगड, सातारा, आणि पुणे (घाट) जिह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनास सतर्प राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 14 व 15 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीचा अंदाज आहे.

मराठवाडा आणि विदर्भात 13 ते 15 सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे.