कल्याण, डोंबिवलीत भयकंप; एका दिवसात भटक्या कुत्र्यांचे 67 जणांना चावे

कल्याण आणि डोंबिवली शहरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच दिवशी ६७ नागरिकांचा चावा घेतला आहे. इतक्या मोठ्या संख्येने कुत्र्यांचे हल्ले वाढल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. शालेय विद्यार्थ्यांचे पालक धास्तावले आहेत. वल्लीपीर रोडवर एकच कुत्रा तब्बल पाच जणांना चावला असल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे. या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कल्याण आणि डोंबिवली शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कल्याण पश्चिमेतील वल्लीपीर रोड परिसरात आज एका कुत्र्याने सलग पाच जणांचा चावा घेतला. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना रुक्मिणी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दिवसभरात शहरात ६७ नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी लक्ष्य केले आहे. कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून शालेय विद्यार्थ्यांचे पालक टेन्शनमध्ये आले आहेत. कुत्र्यांकडून झालेल्या हल्ल्याचे प्रकार ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

दुचाकींचा पाठलाग
कल्याण, डोंबिवली शहरात रात्री-अपरात्री कामावरून परतणाऱ्या नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा मोठा जाच सहन करावा लागत आहे. शहरातील कचराकुंड्या, उकिरडा, रेल्वे स्टेशन, मंदिर परिसर, शाळांचे पटांगण, सोसायटी आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी भटके कुत्रे टोळीने राहतात. या भागातून एखादी दुचाकी किंवा चारचाकी गाडी जात असल्यास हे कुत्रे त्या गाडीचा पाठलाग करतात. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघातही घडत आहेत.