शिरसाट-पारोळ रस्ता दोन महिन्यांत उखडला; निकृष्ट कामाचा फटका

थातूरमातूर मलमपट्टी लावून बनवलेला शिरसाट-पारोळ रस्ता दोनच महिन्यांत उखडला आहे. ठेकेदाराच्या भ्रष्ट कारभाराचा नमुनाच असलेल्या या रस्त्याच्या निकृष्ट कामाची पावसाने पोलखोल केली आहे. ‘पाऊस आला धावून आणि डांबर गेले वाहून’ अशी स्थिती या रस्त्याची झाली आहे. रस्त्यावर फक्त खडी व दगडगोटे उरल्यामुळे हे रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. ठेकेदाराच्या या बेफिकीरपणामुळे परिसरातील हजारो ग्रामस्थांच्या नशिबी खडखड प्रवास कायम आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला लागून शिरसाड वजेश्वरी रस्ता आहे. शिरसाड मार्ग म्हणजे ग्रामीण भागातील जनतेची जीवनवाहिनी असून या रस्त्यावरून दररोज हजारोंच्या संख्येने कामगार, विद्यार्थी, रुग्ण, गणेशपुरी व वजेश्वरी येथे येणारे भाविक प्रवास करतात. मात्र या मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. याची दखल घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी केली होती. याबाबात सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता शैलेंद्र गायकवाड यांना तालुकाप्रमुख काकासाहेब मोटे, उपतालुकाप्रमुख देवानंद पाटील, शाखाप्रमुख मिलिंद किणी, माजी शाखाप्रमुख संदीप कुडू यांनी निवेदन दिले. त्यानंतर प्रशासनाने थुकपट्टी लावून रस्त्याची दुरुस्ती केली. ऑगस्ट महिन्यात पडलेल्या धुवांधार पावसामुळे या रस्त्याची खडी उखडली.

चांदीप, पारोळ आदी ठिकाणी जागोजागी खड्डे पडले आहेत. गर्भवती महिला आणि वृद्धांना या रस्त्यावरून प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. थातूरमातूर रस्त्याची मलमपट्टी करणाऱ्या ठेकेदारांवर प्रशासन कारवाई कधी करणार?
-दयानंद म्हात्रे, शिवसैनिक