
गडचिरोलीत ताडगावच्या तिरकामेता वनक्षेत्रात रेकी करताना एका नक्षलवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे. शंकर भीमा महाका (32) असे अटक केलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. शंकर हा भामरागड दलम या विशेष नक्षलवादी युनिटचा सक्रिय सदस्य आहे. हत्या, जाळपोळ आणि स्फोटांच्या अनेक घटनांमध्ये शंकरचा सहभाग आढळून आला आहे.
भामरागड उपविभागातील तिरकामेता वनक्षेत्रात पोलिसांची नक्षलवाद्यांविरोधात मोहीम सुरू आहे. या शोध मोहीमेदरम्यान विशेष ऑपरेशन्स टीमच्या दोन तुकड्यांना एका तरुणाच्या संशयास्पद आढळून आल्या. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान, त्याचे नाव शंकर महाका असून, तो नक्षलवादी आहे. तसेच त्याच्या अटकेवर महाराष्ट्र सरकारने 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, असे निष्पन्न झाले.
गडचिरोली पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सुरक्षा दलांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने परिसराची रेकी करत होता. पोलिसांनी त्याला अटक केली आणि पुढील कारवाई सुरू आहे.