IND VS PAK – टीम इंडियासमोर पाकड्यांचे लोटांगण, सात गडी राखून केला दणदणीत पराभव

आशिया कपमध्ये टीम इंडिया व पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. टीम इंडियाच्या दमदार गोलंदाजी व जबरदस्त फलंदाजीपुढे पाकड्यांनी सपशेल लोटांगण घातलं व टीम इंडियाने हा सामना आठ गडी राखून जिंकला. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानसमोर विजयाची मालिका हिंदुस्थानने कायम ठेवली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडलेल्या पाकड्यांचा टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे निभावच नाही लागला. फक्त शाहिबझादा फरहान (44 चेंडून 40 धावा) आणि शाहिन आफ्रिदी (16 चेंडून 33 धावा) या दोघांमुळे पाकिस्तानच्या संघांने शंभरी पार केली. पाकिस्तानच्या सहा खेळाडूंना दोन अंकी आकडा देखील गाठता नाही आला. कुलदीप यादवने 3, जसप्रीत बुमराहने व अक्षर पटेल प्रत्येकी 2 आणि हार्दीक पांड्या व वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत पाकिस्तानच्या नऊ खेळाडूंना तंबून पाठवले. 20 षटकांअखेर पाकिस्तानने 127 धावा केल्या.

128 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. मात्र दुसऱ्याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूंवर शुभमन गिल बाद झाला व टीम इंडियाला पहिला धक्का बसला. त्यानंतर जोरदार फटकेबाजी करणारा अभिषेक शर्मा तिसऱ्या षटकात 31 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार सुर्यकुमार यादव व तिलक वर्माने डाव सावरला व तिसऱ्या विकेटसाठी 56 धावांची खेळी केली. सामना टीम इंडियाच्या बाजूने झुकत असतानाच साईम अयुबने तिलक वर्माचा त्रिफळा उडवला. पण मागून आलेल्या शिवम दुबेने सुर्यकुमारला चांगली साथ दिली व त्या दोघांनी मिळून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.