अंधारात आठ मुलांच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले

ओडिसा राज्यातील कंधमाल जिह्यातील फिरिंगिया तालुक्यातील एका शाळेत धक्कादायक प्रकार घडला. सेबाश्रम स्कूलच्या वसतिगृहातील एका मुलाने अन्य विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले. हे सर्व विद्यार्थी झोपले होते. डोळ्यात फेविक्विक टाकल्यानंतर या आठ विद्यार्थ्यांना काहीच दिसत नव्हते. त्यानंतर हे विद्यार्थी घाबरून इकडे-तिकडे पळत होते. यात सगळे जण जखमी झाले. तसेच त्यांच्या डोळ्यांनाही इजा झालेली आहे. विद्यार्थ्यांची अवस्था लक्षात घेता लगेच त्यांना फुलबानी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांची एक टीम या विद्यार्थ्यांवर उपचार करत आहे. सध्या सात विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत, तर उर्वरित एका विद्यार्थ्याची प्रकृती चांगली असल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.