मीनाक्षीचा ‘सुवर्ण’पंच, हिंदुस्थानची चार पदके

हिंदुस्थानच्या मीनाक्षीने महिलांच्या 48 किलो गटात सुवर्णपदक काबीज करत जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली. 24 वर्षीय मीनाक्षीने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात कझाकिस्तानच्या नाझिम किझायबेला 4-1 अशा फरकाने पराभूत करत हिंदुस्थानची चार पदकांसह मोहीम फत्ते केली.

या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी मीनाक्षी ही दुसरी हिंदुस्थानी बॉक्सर ठरली. तिच्या आधी शनिवारी रात्री उशिरा 57 किलो गटात जैस्मिन लांबोरिया हिने सुवर्णपदक पटकावले होते. तिने अत्यंत जबरदस्त कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती पोलंडची ज्युलिया स्झेरेमेटाला 4-1 ने हरवून सोनेरी यशाला गवसणी घातली. या यशामुळे हिंदुस्थानी महिलांनी स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशी एकूण चार पदके जिंकली, मात्र पुरुष विभागात हिंदुस्थानच्या पदकाची झोळी रिकामीच राहिली.

मीनाक्षीने आपल्या उंचीचा फायदा घेत ‘हिट ऍण्ड मूव्ह’ ही रणनीती अवलंबली. पहिल्याच फेरीत तिने 4-1 अशी आघाडी घेतली. दुसऱया फेरीत नाझीमने आक्रमक खेळ करत 3-2 अशी आघाडी घेतली होती. मात्र 2022 मध्ये 52 किलो गटात आशियाई रौप्यपदक पटकावलेल्या मीनाक्षीने अंतर राखून अचूक प्रहार केले आणि प्रतिस्पर्धीच्या जोरदार फटक्यांचा प्रभाव कमी केला. यासोबतच तिने जुलैमध्ये अस्तानामध्ये झालेल्या बॉक्सिंग कपमधील पराभवाचेही उट्टे काढले. अंतिम फेरी गाठण्यासाठी मीनाक्षीने दोनवेळच्या आशियाई कांस्यपदक विजेत्या मंगोलियाच्या लुत्सैखानी अल्टेन्सेटसेग हिचा पराभव केला होता.