
आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानला चीनकडून 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेतील विजेतेपदासह चीनने आगामी वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये होणाऱया हॉकी वर्ल्ड कपचेही तिकीट बुक केले, तर हिंदुस्थानी महिलांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
हिंदुस्थानने सामन्याची सुरुवात दमदार केली होती. पहिल्याच मिनिटाला नवनीत कौर हिने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करत हिंदुस्थानला आघाडी मिळवून दिली, मात्र दुसऱया सत्रात चीनने बरोबरी साधली आणि त्यानंतर तीन गोल करीत सामना आपल्या बाजूने फिरवला. तिसऱया सत्रात हिंदुस्थानने जोरदार लढा दिला, पण पेनल्टी कॉर्नरवरून हल्ला करताना चीनच्या ली होंग हिने अप्रतिम प्रतिहल्ल्यात गोल केला. शेवटच्या सत्रात चीनने वर्चस्व गाजवत 4-1 असा विजय निश्चित केला.




























































