नागपुरात मृत महिला 36 वर्षांनंतर अवतरली!

36 वर्षांपूर्वी एक महिला नागपुरातून बेपत्ता झाली होती. तिच्या मुलीला वाटलं की तिच्या आईचा मृत्यू झाला आहे. पण अचानक 36 वर्षांनंतर ही महिला परत आली. तब्बल 36 वर्षांनंतर या माय लेकीची भेट झाली आणि अश्रूंचा बांध फुटला.

महिमा (नाव बदललेले) ही महिला नागपुरात राहत होती. तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती. नवरा सतत दारू प्यायचा आणि मारायचा. त्यात सासूही त्रास द्यायची. गरोदर असलेली महिमा हा सारा प्रपंच सोडून निघून गेली. वर्षे सरली, कुटुंबीयांना वाटले की महिमा आता या जगात नसेल. महिमा 36 वर्षांपूर्वी नागपूरच्या जैताळ्यातून गायब झाली आणि कालांतराने ती मृत झालेली आहे, असे तिच्या कुटुंबीयांना वाटले. तिचा पती सहा वर्षांपूर्वी वारला, मुलगा दोन वर्षांपूर्वी आजाराने दगावला. तर मुलगी आता 38 वर्षांची असून बुटीबोरी परिसरात वाढली.

2018 मध्ये, पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा येथील शासकीय निवारागृहात महिमाचा मागोवा लागला. ती थोडीफार मराठी बोलत होती, ज्यावरून तिचे मूळ महाराष्ट्रातील असल्याचा अंदाज बांधला गेला. घर सोडून भटकंती करताना तिने आणखी एका मुलीला जन्म दिला होता. 2024 मध्ये आई-मुलीला मुंबईतील कस्तुरबा महिलागृहात हलविण्यात आले. तिथल्या कर्मचाऱ्यांना तिचा नागपूरशी संबंध असल्याचा अंदाज आला, कारण ती वारंवार बुटीबोरीचा उल्लेख करीत होती.

असा घेतला मागोवा

2025 पर्यंत महिमाला नागपूरमधील शासकीय प्रियदर्शिनी महिला गृहात आणण्यात आले. तिच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे तिला पागलखाना चौक येथील प्रादेशिक मानसिक रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे समाजसेवा अधीक्षिका कुंदा बिडकर (काटेखये) आणि मानसोपचारतज्ञ डॉ. पंकज बागडे यांनी तिच्या प्रकरणात सहानुभूतीने पुढाकार घेतला. समुपदेशनादरम्यान बिडकर यांनी महिमा ‘सोनाराजा’ हे नाव घेत असल्याचे लक्षात घेतले, जे एक टोपणनाव असावे. महिमाने अस्पष्टपणे बुटीबोरीची आठवण काढली, जिथे तिचे वडील टपालमास्तर होते.

बिडकर यांनी बुटीबोरी पोस्ट ऑफिसचे नोंदी तपासल्या, पण तिच्या वडिलांचा ठावठिकाणा लागला नाही. तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर बिडकर यांना अखेर जैताळ्याचा संदर्भ मिळाला, जिथे तिचे सासरचे राहत होते. अखेर पोलिसांना जैताळ्यातील तिचे कुटुंब शोधण्यात यश आले आणि 36 वर्षांनंतर माय लेकीची भेट झाली.