
हिंदुस्थानचे आघाडीचे बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रांकीरेड्डी-चिराग शेट्टी आणि लक्ष्य सेन यांना हाँगकाँग ओपनच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे हिंदुस्थानला सुवर्ण लढतीत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग जोडी विजेतेपदाच्या अगदी जवळ पोहोचली होती. मात्र, चीनच्या लियांग वेइकेंग आणि वांग चांग या जोडीने त्यांना 62 मिनिटांच्या संघर्षपूर्ण लढतीत 21-19, 14-21, 17-21 अशा फरकाने हरवले. पहिला गेम जिंकून हिंदुस्थानी जोडीने दमदार सुरुवात केली होती. सात्विकच्या फ्लॅट स्मॅशेस आणि चिरागच्या नेटवरील अचूक नियंत्रणामुळे ते वरचढ दिसत होते. परंतु दुसर्या गेमपासून चिनी जोडीने आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड मिळवली. निर्णायक तिसर्या गेममध्ये सुरुवातीला 0-6 अशा पिछाडीवर गेल्याने हिंदुस्थानी जोडीला पुन्हा उभारी घेणे कठीण ठरले. शेवटच्या क्षणी त्यांनी झुंजार खेळ दाखवत फरक कमी केला, पण विजय हुकला.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात लक्ष्य सेनचेही सोनेरी स्वप्न भंगले. त्याला दुसर्या मानांकित चीनच्या ली शि फेंगकडून 15-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवांनंतरही हिंदुस्थानी खेळाडूंचा झुंजार आणि कौशल्यपूर्ण खेळ कौतुकास्पद ठरला. सात्विक-चिराग जोडीने अलीकडील मोहिमांमध्ये सातत्याने सिद्ध केले आहे की ते जगातील अव्वल दुहेरी जोडय़ांपैकी एक आहेत तर लक्ष्य सेनने पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवत भविष्यातील यशाची आशा वाढवली आहे. हाँगकाँग ओपनमध्ये सोने हुकले असले तरी हिंदुस्थानी बॅडमिंटनचा भविष्यातील प्रवास हा सोनेरी असेल, याचे संकेत पुन्हा एकदा दिसले आहेत.