
घाटकोपर येथील अपघात प्रकरणी तिघांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली. आरोपींमध्ये महिला चालकासह तिच्या दोन मित्रांचा समावेश आहे. त्या तिघांनाही रविवारी दुपारी लोकल कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महिला ही घाटकोपर येथे राहते. तिचे गरबा क्लासेस आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा ती तिची मैत्रिण आणि मित्रा सोबत पार्टी ला गेली होती. शनिवारी सकाळी साडेसहा वाजता ते घाटकोपर येथून कुर्ल्याच्या दिशेने जात होते. यावेळी महिला ही कार चालवत होती. ही कार घाटकोपरच्या लालबहादूर शास्त्री मार्ग, उपजलअभियंता कार्यालयासमोरुन जात असताना अचानक तिचे कारवरील नियंत्रण सुटले आणि तिने कार दुभाजकावरुन दुकानाच्या पायर्यावर आदळली. तिथे एक व्यक्ती झोपला होता. कारच्या धडकेने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते. अपघाताची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.