
वाहतुकीसाठी बंद केलेल्या एल्फिन्स्टन पूलावरील प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या तिकीट बुकिंग कार्यालयाचे स्थलांतर केले जाणार आहे. याच अनुषंगाने पश्चिम रेल्वे नवीन जागेबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेणार असल्याचे समजते. तिकीट बुकिंग कार्यालय दुसरीकडे हलवण्याबाबत अद्याप चर्चा सुरू आहे. मात्र लवकरच नवीन ठिकाण निश्चित केले जाईल, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सव्वाशे वर्षे जुना एलफिन्स्टन पूल शुक्रवारी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तसेच येत्या 15 दिवसांत हा पूल सामान्य प्रवाशांसाठी बंद करण्यात येणार आहे. याचदरम्यान पुलावर असलेल्या तिकीट काउंटरचे स्थलांतर करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तिकीट काऊंटर कोणत्या बाजूला हलवायचे, याबद्दल अद्याप कोणतेही स्पष्टीकरण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही. प्रभादेवी स्थानकाच्या पूर्वेला पश्चिम रेल्वेचे एकही तिकीट काउंटर नाही. अशा परिस्थितीत तिकीट काउंटर पूर्वेलाच हलवण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.