वरळी-शिवडी उन्नत रस्त्यासाठी डिसेंबर 2026चा नवा मुहूर्त, एलफिन्स्टन पूल पाडल्यानंतर रस्ताकामाला गती मिळणार

एलफिन्स्टन पुलाचे पाडकाम सुरू करण्यात आल्याने वरळी-शिवडी उन्नत रस्त्याच्या कामाला गती मिळण्याची चिन्हे आहेत. गेले काही महिने एलफिन्स्टन पुलाचा प्रश्न सुटत नव्हता. त्यामुळे या पुलाच्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्याचे काम रखडले होते. आता पुढील 14 महिन्यांत द्विस्तरीय पुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निश्चित केले आहे. त्यानुसार वरळी-शिवडी उन्नत रस्ता डिसेंबर 2026 मध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

एमएमआरडीएमार्फत वरळी-शिवडी उन्नत रस्त्याचे काम केले जाणार आहे. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई प्रवास अवघ्या 12 मिनिटांत पार करणे शक्य होत आहे. याच पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने कोस्टल रोड आणि वरळीवरून अटल सेतूकडे अतिजलद जाण्यासाठी 4.5 किमीचा आणि 17 मीटर रुंदीचा वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. अंदाजे 1051 कोटींचा खर्च असलेल्या या प्रकल्पाचे काम 2021 मध्ये सुरू केले होते. त्यानंतर तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र एलफिन्स्टन पुलाच्या प्रश्नामुळे उन्नत रस्त्याच्या कामाची रखडपट्टी झाली होती. स्थानिक रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे एलफिन्स्टन पुलाच्या पाडकामाला तीव्र विरोध झाला होता. त्याबाबत तोडगा निघाल्यानंतर अखेर एलफिन्स्टन पुलाचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे. हा पूल पाडल्यानंतर उन्नत रस्त्याच्या कामाला वेग मिळेल आणि डिसेंबर 2026 मध्ये उन्नत रस्ता वाहतुकीसाठी खुला करू, असे एमएमआरडीएतील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

द्विस्तरीय पुलासाठी 14 महिने लागणार

एलफिन्स्टन पुलाचे पाडकाम 60 दिवसांत पूर्ण करून नंतर द्विस्तरीय पुलाचे काम सुरू केले जाणार आहे. एलफिन्स्टन पूल बंद झाल्यामुळे झालेली वाहतूककोंडी लक्षात घेता द्विस्तरीय पूल आणि उन्नत रस्त्याच्या कामासाठी 14 महिने लागण्याची शक्यता आहे. आतापर्यंत उन्नत रस्त्याचे काम 62 टक्के पूर्ण झाले आहे.