रेल्वे प्रवाशांची रखडपट्टी

उपनगरी रेल्वेच्या प्रवाशांची रविवारी मेगाब्लॉकमुळे मोठी गैरसोय झाली. हार्बर लाईनवर साडेचौदा तासांचा ब्लॉक तसेच मेन लाईनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला होता. हार्बरवरील लोकलसेवा वडाळा ते मानखुर्द स्थानकांदरम्यान दुपारी दीड वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. परिणामी, या मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

मध्य रेल्वेने अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवारी ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मुख्य मार्गांवर मेगाब्लॉक घेतला होता. या कालावधीत अनेक अप मेल/एक्प्रेस गाड्या कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात आल्या. तसेच डाऊन मेल/एक्प्रेस गाड्या ठाणे व कल्याणदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे लोकलसेवेवर मोठा परिणाम झाला. सर्वच लोकल गाड्या उशिराने धावल्या. हार्बर मार्गावर कुर्ला-टिळकनगर विभागात घेतलेल्या ट्राफिक ब्लॉकचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. प्रवाशांना ट्रान्स हार्बर मार्गाचा वळसा घालून नवी मुंबई, मुंबईचा प्रवास करावा लागला.