एनडीएच्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी वाहतूककोंडीत अडकले, अनेकांचा पेपर चुकला; वेळ उलटल्याने परीक्षा केंद्रात ‘नो एण्ट्री’

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेण्यासाठीची एनडीए परीक्षा तसेच सीडीएस परीक्षेला बसलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना रविवारी वाहतूककोंडी आणि मेगाब्लॉकचा मोठा फटका बसला. अनेक विद्यार्थी प्रवासातच रखडल्याने त्यांचा पेपर चुकला. पेपर सुरू होण्याची निर्धारित वेळ उलटल्याने त्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला नाही. गेट बंद झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच माघारी परतावे लागले.

लष्कर, नौदल आणि हवाई दलात अधिकारी बनू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एनडीए परीक्षा आणि संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) परीक्षा या दोन परीक्षांचे रविवारी मुंबईतील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजन केले होते. या परीक्षा देण्यासाठी मुंबईसह डहाणू, पनवेल, नवी मुंबई, कल्याण आदी परिसरांतून विद्यार्थी आले होते. बहुतांश विद्यार्थ्यांना प्रमुख महामार्गांवरील वाहतूककोंडीचा फटका बसला. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक मार्गांवर रविवारी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावर कोंडी झाली होती. याबरोबर उपनगरी रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक होता. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पडलेले अनेक विद्यार्थी प्रवासातच लटकले. परिणामी, ते परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. सकाळी 10 वाजता पेपर सुरू झाल्यानंतर आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या गेटवरूनच माघारी परतावे लागले. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे जागोजागी वाहतूककोंडी होत आहे. सरकारच्या निक्रियतेमुळे एऩडीए आणि सीडीएस परीक्षेचा प्रयत्न हुकल्याने विद्यार्थी आणि पालकांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

वयोमर्यादा उलटल्याने अनेकांचे स्वप्न भंगले!

सहा महिने अभ्यासासाठी प्रचंड मेहनत घेऊन विद्यार्थी एनडीए आणि सीडीएसची परीक्षा देतात. रविवारी ही परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आता एप्रिलमध्ये पुन्हा प्रयत्न करावा लागणार आहे. मात्र वयोमर्यादेच्या दृष्टीने शेवटचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे संरक्षण दलात अधिकारी बनण्याचे स्वप्न भंगले आहे.

करिअरचे नुकसान झाले, त्याला जबाबदार कोण?

एनडीए परीक्षा रविवारी घेतली जाते, तर मुंबईत प्रत्येक रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक असतो. राष्ट्रीय परीक्षांच्या दिवशी ब्लॉक रद्द करण्याचे सौजन्य प्रशासन दाखवत नाही. त्यामुळे प्रत्येक परीक्षेला अनेक विद्यार्थ्यांचे वेळेचे गणित कोलमडते, त्यांचा एक प्रयत्न परीक्षा न देताच अयशस्वी होतो. यातून विद्यार्थ्यांच्या मोठे करीअरचे नुकसान होत असून त्याला जबाबदार कोण, असा सवाल डहाणू येथील विद्यार्थ्याने उपस्थित केला.

दादरच्या टिळक पुलावर अनेक परीक्षार्थींची कोंडी

रविवारी एनडीए आणि सीडीएस अशा दोन परीक्षांचे पेपर होते. या परीक्षा देण्यासाठी दादर, परळ, माटुंगा परिसरातील परीक्षा केंद्रांवर जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना एलफिन्स्टन पूल बंद केल्यामुळे झालेल्या वाहतूककोंडीचा फटका बसला. दादरच्या टिळक पुलावर सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या वाहतूककोंडीमुळे अनेक विद्यार्थी अर्धा ते पाऊण तास तिथेच खोळंबले. त्या विद्यार्थ्यांना एनडीए, सीडीएसच्या परीक्षेला बसता आले नाही.