डोंबिवलीकरांचे पाणी महागले! औद्योगिक क्षेत्रासाठी प्रति युनिट पावणेतीन, निवासीसाठी एक रुपयाची वाढ

water-tab

एमआयडीसीने पाणी दरात दर युनिट मागे निवासीसाठी एक रुपया आणि औद्योगिक क्षेत्रासाठी पावणेतीन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आली असून त्याचा फटका डोंबिवलीतील ल घु, मध्यम व मोठ्या उद्योगांसह रहिवाशांनाही बसणार आहे. या निर्णयामुळे जनतेत व उद्योजकांमध्ये तीव्र असंतोष आहे. एमआयडीसीने ही दरवाढ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठाणे जिल्ह्यातील उद्योजक संघटनांनी दिला आहे.

आधीच महागाई आणि उत्पादन खर्चामुळे त्रस्त असलेल्या लघु व मध्यम उद्योगांसाठी ही दरवाढ अतिरिक्त आर्थिक भार निर्माण करणारी आहे. सामान्य नागरिकांवरही त्याचा परिणाम होईल. ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणातून मुरबाड आणि बदलापूर भागात पाणीपुरवठा केला जातो. मात्र मोठ्या व्यासाच्या पाइपलाइनमधून १५ टक्के इतकी गळती होत आहे. याशिवाय पाण्याची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. अनेक संस्था व नागरिकांनी उपाययोजना सुचवल्या तरीही एमआयडीसी प्रशासनाला प्रभावी उपाययोजना करण्यात अपयश आले आहे. मूलभूत गरज असलेल्या पाण्यासारख्या सेवेसाठी दरवाढ करणे योग्य नसल्याची भावना डोंबिवलीकरांनी व्यक्त केली.

एमआयडीसीने केलेली दरवाढ अपेक्षित नव्हती. आधीच अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाण्याच्या टाक्या भरतच नाहीत. शुक्रवारी शटडाऊन घेतात पण त्यानंतर दोन दिवस पाणी येतच नाही. कारखान्यांना मुबलक पाणी मिळाले पाहिजे.
-वर्षा महाडिक, उद्योजक, डोंबिवली

पाणी चोरी, गळती आधी थांबवा !
पाणी गळती व चोरी थांबवणे, थकबाकी वसूल करणे आणि पारदर्शक प्रशासन यावर एमआयडीसीने भर दिला पाहिजे. नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांवर दरवाढ लादणे अन्यायकारक आहे, अशी नाराजी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी व्यक्त केली.

असा बसेल फटका
एमआयडीसीने काढलेल्या परिपत्रकानुसार निवासी क्षेत्रासाठी सध्याचा दर प्रति युनिट ८.२५ रुपये असून तो वाढून ९.२५ रुपये होणार आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी सध्याचा दर २२.५० रुपये असून तो वाढून २५.२५ रुपये प्रति युनिट होणार आहे.