
70 खाटांच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर देण्याचे आमिष दाखवून एका डॉक्टर दाम्पत्याने फार्मासिस्टसह डॉक्टरला तब्बल ७० लाखांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना २०२४ मध्ये घडली असून याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात डॉक्टर दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटच्या पलासिया बिल्डिंगमध्ये डॉ. प्रसाद आणि त्यांची पत्नी वैशाली साळी राहतात. या दोघांनी कल्याण आरटीओ कार्यालयाजवळ असलेल्या आयकॉन बिल्डिंगमध्ये पन्नास खाटांचे हॉस्पिटल बांधून त्यात मेडिकल स्टोअर देण्याच्या नावाखाली डॉ. राहुल दुबे आणि फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळे यांच्याकडून ७० लाख रुपये उकळले. त्यावेळी डॉ. प्रसाद यांनी फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळे आणि डॉ. राहुल दुबे यांना ३ महिन्यांत हॉस्पिटल सुरू करण्याचे आमिष दाखवले. परंतु वर्ष उलटूनही गेले तरी साळी दाम्पत्याने हॉस्पिटल सुरू केले नाही आणि पैसेही परत केले नाहीत.
बंटी बबलीचा शोध सुरू
हॉस्पिटल सुरू करण्यासाठी साळी दाम्पत्याला मोठ्या रकमेची गरज होती. म्हणून त्यांनी मेडिकल स्टोअर उघडण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम उकळली. डॉ. प्रसाद साळी यांनी ८० लाख रुपये मागितले होते, परंतु आम्ही त्यांना ७० लाख रुपये चेकद्वारे दिले, अशी माहिती डॉ. राहुल दुबे आणि प्रज्ञा कांबळे यांनी दिली. खडकपाडा पोलीस फरार झालेल्या बंटी बबलीचा कसून शोध घेत आहेत.