
मीरा-भाईंदर महापालिकेने जाहीर केलेल्या मेगा भरतीतून वयाची मर्यादा ओलांडणारे कंत्राटी फायरमन बाद होणार आहेत. त्यामुळे याला विरोध दर्शवत या कर्मचाऱ्यांनी कामगार न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर १२ सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र यावेळी पालिकेचे वकील गैरहजर राहिल्याने न्यायाधीशांनी सुनावणी पुढे ढकलत १८ सप्टेंबरची तारीख दिली आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेने ३५८ पदांची भरती जाहीर केली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत १२ सप्टेंबरपर्यंत देण्यात आली होती. या मेगा भरतीत २४१ एवढी सर्वाधिक पदे फायरमनची आहेत. या सर्व पदांसाठी टीसीएसकडून लेखी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. भरतीसाठी नियमानुसार वयाची मर्यादा निश्चित केली आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या भरतीत अग्निशमन विभागात गेल्या ७ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करत असलेले ७५ फायरमन वयाची मर्यादा ओलांडल्याने बाद ठरले आहेत. या भरतीत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या फायरमन्सना प्राधान्यक्रम देत थेट सेवेत सामावून घेण्याची मागणी या फायरमन्सनी पालिकेकडे केली आहे, पालि केने या कर्मचाऱ्यांना थेट सेवेत सामावून घेण्यास नकार दिला. याविरोधात कंत्राटी फायरमन्सनी १० सप्टेंबर रोजी कामगार न्यायालयात याचिका दाखल केली आहे.