
भूमिपुत्रांकरिता आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे यासाठी आज भिवंडीतील माणकोली ते उरणच्या जासई गावापर्यंत भव्य कार रॅली काढण्यात आली. त्यात मोठ्या संख्येने दिबाप्रेमी व स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले होते. दिबांचे नाव विमानतळाला न दिल्यास नवी मुंबईतील एकाही विमानाचे टेक ऑफ होऊ देणार नाही, असा थेट इशारा भूमिपुत्रांनी केंद्र सरकारला दिला आहे.
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य विमानतळ उभे राहात असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या महिन्याच्या अखेरीस हे विमानतळ खुले होत असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. ‘आमच्या मनानं घेतलाय ठाव.. विमानतळाला दि. बा. पाटलांचंच नाव’ अशा घोषणा देत भूमिपुत्रांनी अनेकदा आंदोलन छेडले. केंद्र सरकारबरोबर पत्रव्यवहारावरही केला. पण सरकारने दिबांचे नाव देण्याची घोषणा अद्यापि केली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव केंद्र सरकारला पाठवला होता. पण अजूनपर्यंत याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.
आज ठाणे तसेच रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र आणि आगरी-कोळी बांधवांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भव्य कार रॅली काढली. या रॅलीमध्ये ज्येष्ठ नेते आर. सी. पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते विश्वास थळे, बबन पाटील, खासदार संजय पाटील, नवी मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख एम. के. मढवी, जिल्हाप्रमुख कुंदन पाटील, मनसेचे डी. के. म्हात्रे, माजी आमदार राजू पाटील, डॉ. रूपाली कराळे, शारदा म्हात्रे आदी सहभागी झाले होते.
ठिकठिकाणी स्वागत
भिवंडी ते जासईदरम्यान काढण्यात आल `ल्या भूमिपुत्रांच्या रॅलीमध्ये विविध पक्ष तसेच संघटना सहभागी झाले होते. या रॅल ीचे खारेगाव, कळवा, विटावासह विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोळी समाजाच्या महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधले.
माणकोली मोठा गाव येथे दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा शुभारंभ झाला. त्यात विविध रा-जकीय पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारीदेखील सहभागी झाले होते.
ही रॅली कळवा नाका, दिघा रेल्वे स्थानक, घणसोली नाका, वाशी-अरेंजा सर्कल, नवी मुंबई पालिका मुख्यालयमार्गे उरणमधील दिबांचे जन्मस्थळ असलेल्या जासई येथे पोहोचली.
केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेतल नाही तर विमानतळावरून एकही विमान उडू देणार नाही. उलट आमचा लढा तीव्र करू, असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे यांना जासई येथे झालेल्या सभेत दिला आहे.