
काशिमीरामध्ये मृत व्यक्ती चक्क जिवंत झाल्याने आश्चर्य केले जात आहे. भामट्यांनी मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे बनवून थेट जमिनीचा सौदाच केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी धर्मेश शहा, विनू रवानी व अमृत रामानी या तीन भामट्यांना अटक केली. या तिघांनी अन्य तीन साथीदारांच्या मदतीने गुजरातच्या भावनगर येथे पॉवर ऑफ अटर्नी नोंद करत सदर २० एकर ३० गुंठे जागा दुसऱ्याला विकण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाजनवाडी नवीन सर्व्हे क्रमांक ८ ही जमीन धरनीधर शहा (डी. के. शहा) यांच्या मालकीची असून या २० एकर ३५ गुंठे जमिनीच्या सातबाऱ्यावरही त्यांचेच नाव आहे. धरनीधर शहा यांनी ही जमीन १९७८ साली खरेदी केली होती. त्यानंतर १९९४ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या सातबाऱ्यावर वारसदार म्हणून मुलगा मनीष शहा त्यांची पत्नी बिंदू शहा व त्यांचा मुलगा मानव शहा यांची नावे लावण्यात आलेली आहेत. दरम्यान भावनगरमधील धर्मेश शहा याने धरनीधर शहा यांच्या संक्षिप्त नावाचा दुरुपयोग करून डी. के. शहा नावाने अॅथॉरिटी लेटर व इतर बनावट दस्तऐवज बनवून गुजरातच्या विनू रवानी व अमृत रामानी यांना स्पेशल पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे विक्री करारनामा व इतर हक्क दिले.
तिघांचा शोध सुरूच
गुन्हा दाखल होताच काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमले. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक पानमंद यांच्या पथकाने मीरा रोडच्या पेणकरपाडा परिसरात सापळा रचत धर्मेश शहा, विनू रवानी व अमृत रामानी यांना अटक केली. त्यांचे तीन साथीदार राजेश तोगडिया व भरत चोहला आणि मनू पटेल हे फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.