
दिवा शहराची तह तहान भागावी यासाठी ठाणे पालिकेने बेतवडे येथे दोन विशाल जलकुंभांची उभारणी केली खरी. मात्र या जलकुंभातून पाण्याचा टिपूसही न आल्याने आज संतप्त दिवावासीयांनी पाण्याच्या टाकीचे श्राद्ध घालत जोरदार आंदोलन केले. उभारण्यात आलेले जलकुंभ बारा वर्षांपासून बंद असून हे जलकुंभ पांढरा हत्ती ठरले आहे. दरम्यान थेट घराघरात पाणी मिळेल असे दिवास्वप्न दाखवणाऱ्या प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची चांगलीच पोलखोल झाली असल्याची टीका स्थानिकांनी केली.
ठाणे पालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाने केंद्र सरकारच्या योजनेतून दिव्यात करोडो रुपये खर्च केले आहेत. दिव्यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या उद्देशाने बेतवडे येथे २०१२ मध्ये दोन जलकुंभांची उभारणी केली. मात्र हे जल कुंभ अद्याप सुरू झालेले नाही. एकीकडे दिवा शहरातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत असताना दुसरीकडे हे जलकुंभ केवळ शोभेच्या वास्तू बनल्या आहेत. आधीच पाणीपुरवठ्याचा दाब अत्यंत कमी असून अनेक वस्त्यांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती आहे. पाणीटंचाईच्या समस्येविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज आंदोलन केले. महिला संघटक ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी उपशहरप्रमुख तेजस पोरजी, मारुती पडळकर, समन्वयक प्रियंका सावंत, उपशहर संघटक स्मिता जाधव, उपशहर संघटक उज्ज्वला पाटील, शहर संघटक शनिदास पाटील, युवासेनेचे अभिषेक ठाकूरसह विभागप्रमुख, महिला विभाग संघटक, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आदी उपस्थित होते.
जलकुंभाचे श्राद्ध घाल त कार्यकर्त्यांनी मुंडन करून प्रशासनाचा निषेध केला. जर जल कुंभातून पाणीपुरवठा करायचाच नव्हता, तर ते कशाला बांधले? आणि त्यावर झालेला लाखो रुपयांचा खर्च कुणाकडून वसूल करणार?.
– ज्योती पाटील (महिला संघटक दिवा शहर)
नियोजनात सत्ताधारी फेल
दिव्यात अनेक ठिकाणी रोज टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात नेहमीचीच देखभाल, दुरुस्ती, ट्रान्सफार्मर बिघाड, जलवाहिनी फुटणे आदी कारणांसाठी शटडाऊनमुळे घ्यावे लागत आहे. एकीकडे बदलते ठाणे अशी टिमकी वाजणारे सत्ताधारी मात्र पाण्याचे नियोजन करण्यात फेल ठरले आहेत.