
पालघर जिल्हा परिषद कार्याल याच्या शौचालयातच पिले, पिले कार्यक्रम सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. शौचालयात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. या बाटल्या येथे आल्या कशा, कार्यालयाचे कामकाज नशा करून केले जाते का तसेच या शासकीय कार्यालयात दारू पिऊन कोण कोण कामे करतात, असा सवाल उपस्थित झाला आहे. चक्क शौचालयात दारूच्या बाटल्या सापडल्या असल्याने प्रशासनामध्ये सन्नाटा पसरला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
बोईसर रोडवर कोळगाव येथे पालघर जिल्हा परिषद कार्यालय आहे. या कार्यालयात दररोज हजारो नागरिक आपल्या शासकीय कामानिमित्त ये-जा करतात. या कार्यालयाच्या तळमजल्यावरील शौचालयात तसेच शौचालयाच्या मागच्या बाजूला अनेक ब्रँडच्या बाटल्या आढळल्या आहेत. या घटनेनंतर ड्युटीवर येणाऱ्या किंवा कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांकडून दारूचे सेवन केले जात का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेतील शेकडो कर्मचारी, अधिकारी दररोज कार्यालयीन कामकाजासाठी उपस्थित राहतात. तसेच आठ तालुक्यांमधून नागरिकही येथे मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्यामुळे कार्याल यात दारू पिणाऱ्यांचा शोध घेणे प्रशासनापुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे.
नागरिकांमध्ये नाराजी
यापूर्वीही अशाच स्वरूपाचा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात उघड झाल 1 होता. एका विभागात पार्टीसाठी बीयरचे खोके आल्याचे उघडकीस आले होते. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना सक्त ताकीदही दिली होती. पुन्हा समोर आल्याने महिला वर्गासह नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
दारुड्यांचा शोध घ्या !
दारूच्या बाटल्या आढळणे हा बेकायदेशीर प्रकार असून जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे दारुड्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.