वेळेआधी आला..अन् वेळेआधी निघालासुद्धा; परतीच्या पावसाचा महाराष्ट्राला दणका

यंदा मॉन्सून नियोजित वेळेआधी 10 दिवस देशात दाखल झाला. त्याने येण्यासाठी जशी घाई केली, तशीच आता परतीसाठीही त्याची घाई सुरू झाली आहे. राजस्थानच्या काही भागातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. तसेच गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्रातील वातावरण पावसाच्या परतीसाठी पोषक आहे. त्यामुळे त्याचा परतीचा प्रवास वेगाने होण्याची शक्यता आहे. मात्र, या परतीच्या पावसाने महाराष्ट्राला चांगलाच दणका दिला आहे.

हिमाचाल प्रदेश, जम्मू कश्मीर, पंजाबमध्ये प्रकोप केल्यानंतर आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. राजस्थानच्या काही भागातून मान्सून परतला आहे. यावर्षी वेळेपूर्वी आगमन झाल्यानंतर, मान्सूनचा परतीचा प्रवासही वेळेपूर्वी सुरू झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 14 सप्टेंबपासून पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मान्सून परतला आहे, तर त्याची परतीची नियोजित वेळ 17 सप्टेंबर आहे. त्याच वेळी, पुढील २-३ दिवसांत राजस्थानच्या काही भागांमधून आणि पंजाब आणि गुजरातच्या काही भागातून मान्सून परतीसाठी अनुकूल वातावरण आहे.

आतापर्यंत, देशात मान्सून हंगामात ८३६.२ मिमी पाऊस पडला आहे, तर सामान्य पाऊस ७७८.६ मिमी आहे, जो ७ टक्के जास्त आहे. मे महिन्यात, आयएमडीने असा अंदाज वर्तवला होता की जून-सप्टेंबर मान्सून हंगामात भारतात ८७ सेमी या दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ५० वर्षांच्या सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस ‘सामान्य’ मानला जातो.

या परतीच्या पावसाने महाराष्ट्रात रविवारापासून तुफान बॅटिंगला सुरुवात केली आहे. मुंई, ठाणे, पालघर, कोकण किनारपट्टीसह पुणे, मराठवाडा आणि विदर्भातही जोरदार पाऊस होत आहे. मुसळधार पावसाने मुंबईच्या गतीला ब्रेक लागला आहे. सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने चाकरमान्यांना चांगलाच फटका बसला आहे. पावसाने रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेगही मंदावला आहे.

हवामान खात्याने मुंबईला पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट दिला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. मुंबईत मुसळधार पावसाने प्रशासनही अलर्ट झाले असून सखल भागात पाणी साचणार नाही, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पावसामुळे हार्बर आणि मध्य रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरू असून पश्चिम रेल्वेचा वेगही मंदावला आहे.