‘देवा’ जरा इकडे बघ! मराठवाड्यातील अतिवृष्टीवरून अंबादास दानवे यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका

 

मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी इथे लक्ष घालावे, शेतकऱ्यांच्या खात्यात एक दमडाही आला नाही अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

एक्सवर दोन व्हिडीओ पोस्ट करून अंबादास दानवे म्हणाले की, ‘देवा’ जरा इकडे बघ! ‘देवा’ने हे दिले.. ‘देवा’ ने ते दिले.. असा गजर सध्या गल्लीगल्लीतुन भाजपायी भक्तगण अगदी सूर्योदयापासून करताना दिसतात. कचराकुंडी लगतच्या भिंती ते बहुमजली इमारती अश्या सगळ्या ठिकाणी या ‘देवा’चे फोटो लागले आहेत. ज्या शिवरायांच्या पायावर यांचे देवाभाऊ फुले वाहताना दिसतात, त्यांनी कधी आपली प्रजा वाऱ्यावर सोडली नाही. नुसती फुले वाहून चालत नसतंय महोदय. विचार कृतीत उतरवावे लागतात.

तसेच हे खालील दोन व्हिडियो बघून शिवराय आठवले तर त्यांच्या दुःखावर फुंकर घालता येते का बघा! नाही तरी तीन वर्षांपासून शेतकऱ्यांचा हाती फक्त पंचनामे.. पंचनामे आणि पंचनामेच येत आहेत! मदतीचा दमडा त्यांच्या खात्यात आलेला नाही! असेही दानवे म्हणाले.