काहे बैठे हो… ए खडा हो, प्रणाम कर! भरसभेत नितीश कुमारांची ‘मास्तरकी’, मोदींच्या कौतुकासाठी लोकांना बळजबरी उठवले!

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आज भाषण करता करता अचानक शाळा मास्तराच्या भूमिकेत शिरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी व कौतुकासाठी नितीश यांनी सभेला आलेल्या माताभगिनींना आणि तरुणांना बळजबरी उभे केले. इतकेच नव्हे तर उभे राहून मोदींना प्रणाम करा, असा हुकूमही त्यांनी सोडला. त्यांच्या या मास्तरकीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बिहारमधील पूर्णिया येथे मोदींनी सोमवारी काही प्रकल्पांचे उद्घाटन केले. या वेळी झालेल्या सभेत नितीश यांनी मोदींच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. संपूर्ण देशासाठी आणि बिहारसाठी ते खूप काही करत आहेत. सर्वांनी त्यांचे अभिनंदन करा. उभे राहून त्यांचे आभार माना. त्यांना नमस्कार करा, असे नितीश म्हणाले. त्यानंतर काही लोक उठले. मात्र काही लोक बसलेले पाहून नितीश भडकले. कशाला बसून राहिलात? उभा राहा… अशी दमदाटी त्यांनी केली. नितीश यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून त्यांची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.

मी एनडीएतच!

नितीश कुमार हे निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडू शकतात अशी सध्या चर्चा आहे. या सभेत नितीश यांनी ती चर्चा फेटाळून लावली. मी कुठेही जाणार नाही, एनडीएसोबतच राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले.